वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील बेशिस्त वाहतुकीमुळे उद्योजक व वाहनचालकांना सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील तिरंगा चौक, महावीर चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, एफडीसी चौक, आंबेडकर चौक, रांजणगाव फाटा, सिमेन्स चौक, कामगार चौक, बजाजगेट, गरवारेगेट आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम धुडकावून सर्रास राँग साईडने ये-जा करतात. त्यामुळे या चौकात छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. रोज सकाळी व सायंकाळी या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो.औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात उद्योजक, कामगार, व्यावसायिक तसेच मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळविक्रेते, हॉटेल, टपरीचालक, पाणी-पुरीवाले व अवैध वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा, काळी-पिवळी आदी वाहनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुख्य चौकातील रस्ते अरुंद झाले आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मोरे चौक, महाराणा प्रताप चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहेत. परंतु सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी थांबत नसल्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. दुचाकीस्वार तसेच वाहनचालक राँग साईड तसेच चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे अपघात वाढले आहेत. सकाळी कंपनीत जाताना उद्योजक, कामगारांना व शहरातून कामगारांची ने-आण करणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. कामगार कंपनीत पोहोचायला उशीर होत असल्यामुळे शिफ्ट विलंबाने सुरू होते व त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. सायंकाळी घरी परतणारे उद्योजक, कामगार व वाहनचालकांनाही हाच वाहतूक कोंडीचा त्रास होतो. पंढरपुरातील तिरंगा चौक व कामगार चौकात कायम होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या दोन्ही चौकात उड्डाणपुलाची गरज आहे. लवकरच मासिआ संघटनेतर्फे जिल्हा उद्योग मित्रांच्या बैठकीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली जाणार आहे.- राहुल मोगले, उद्योजकवाहतूक शाखेचे दुर्लक्षवाळूज औद्योगिक परिसरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे वाहतूक शाखेचे लक्ष नाही. त्यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. हा प्रश्न वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सोडवावा.- पी. के. गायकवाड, उद्योजक
वाहतुकीला शिस्त लागता लागेना...!
By admin | Published: June 29, 2014 12:49 AM