वाळूज महानगर : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली.
औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर, वाळूज या ठिकाणी हातगाडी, टपरीचालक आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. खरेदीसाठी येणारे वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळे महामार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होत असून, वाहतुकीची कोंडी होत आहे, तसेच अपघाताच्या घटना घडत आहेत. वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी पथकासह शुक्रवारी सायंकाळी पंढरपुरात अतिक्रमणांवर कारवाई केली. यावेळी भाजीपाला, मांस व मच्छी विक्रेते, तसेच इतर व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.