- बापू सोळुंके
औरंगाबाद : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयुक्तालयात सध्या चार वाहतूक शाखा कार्यरत आहेत. परंतु पोलिसांचे लक्ष फक्त जालना रोडवरील काही वाहतूक सिग्नलकडेच केंद्रित झाले आहे. अन्य वाहतूक सिग्नलची अवस्था ‘असून खोळंबा नसून अडचण’अशी झाली आहे. तेथे ना वाहतूक पोलीस असतात, ना तेथे वाहतूक नियमन होते. परिणामी प्रामाणिक वाहनचालक वाहतूक सिग्नलचे नियम पाळतात तर बेशिस्त वाहनचालक बिनधास्त सिग्नल तोडताना नजरेस पडतात.
सिडको, शहर, छावणी आणि वाळूज, असे चार वाहतूक विभाग आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. पंधरा वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करीत असे. आता वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच वाहतूक शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली. मात्र प्रभावी पोलिसिंग हरवली. वाहतुकीची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सामान्यांसाठी खुले चर्चासत्र घेतले होते. या चर्चासत्रात लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी आपली मते मांडताना काही उपाययोजना सुचविल्या होत्या. यापैकी काही सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची ग्वाही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्या चर्चासत्रापासून आजपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत काय बदल केले, याबाबतची माहिती प्रशासन देऊ शकले नाही.
चंपा चौकातील सिग्नल ‘जैसे थे’लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणीही अद्याप झाली नसल्याचे दिसते. यात प्रामुख्याने चंपा चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करून तेथील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी सूचना करण्यात आली होती. मात्र अद्यापही चंपा चौकातील वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलीस नियुक्त झाला नाही. तेथील सिग्नल सुरू असते; परंतु त्याकडे कुणी वाहनचालक पाहतच नाही.
एवढेच नव्हे तर लाल दिवा लागल्यानंतर थांबलेल्या वाहनचालकाकडे लोक आश्चर्याने पाहतात. अन्य एका महत्त्वाच्या सूचनेमध्ये सिटीचौक ते जुनाबाजार दरम्यान रस्त्यावर दुतर्फा दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने ते काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणीही अद्याप पूर्ण झाली नाही. यासोबत काही मार्ग एकेरी करण्याची सूचनाही करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष करून आता शहर शाखेचे विभाजन करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.