लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले असता वाहतूक नियम तोडण्यात सुशिक्षित वाहनधारकच अव्वल असल्याचे समोर आले. तर वाहनधारकांमध्ये दुचाकी आणि रिक्षा चालक सर्वाधिक नियम तोडतात. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. मोठे वाहनधारक मात्र, दुचाकी, रिक्षा चालकांच्या ‘ड्रायव्हिंग’ला घाबरून वाहने सावकाश चालवित असल्याचे दिसून आले.अरूंद रस्ते, अतिक्रमण यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यातच रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहनांच्या पार्किंगने यात अधिकच भर पडली आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. यातच वाहनधारकही सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने वाहतूक समस्येवर मार्ग निघण्यास अडचणी येत आहेत. पोलीसही यावर हतबल झाले आहेत. याच मुद्याला धरून मंगळवारी शहरातील किती वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, याची पाहणी करण्यात आली. यामध्ये अशिक्षित वाहनधारक सावकाश वाहने चालवित होते. परंतु सूटाबुटातील, शर्टींग केलेले असे सुशिक्षित असणारे वाहनधारक मात्र वाहतूक नियम पाळण्यात पिछाडीवर आहेत.तसेच ट्रक, चार चाकी वाहनांपेक्षा रिक्षा व दुचाकीस्वार यांच्याकडून वाहतूक नियमांचे अधिक उल्लंघन होत आहे.बसचालकांना असते घाई...छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडून येणारी एक बस चक्क ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात होती. विशेष म्हणजे दोन मोठी वाहने या रस्त्यावर बसत नाहीत. चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरवली होती. वास्तविक पाहता एवढी वाहतूक कोंडी असतानाही बस चालक घाई करीत असल्याने अपघातास निमंत्रण मिळते.वाहतूक पोलीसही हतबलछत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, आण्णाभाऊ साठे चौक, नगर नाका या भागात पाहणी केली असता वाहतूक नियम तोडणाºया वाहनधारकांना समजावून आणि त्यांना अडवून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारीही हतबल झाले होते. एकावर कारवाई करेपर्यंत इतर दहा वाहनधारक नियम तोडून जात होते. यावेळी ज्याच्यावर कारवाई केली जात होती, तो इतरांकडे बोट दाखवितानाही दिसून आले. यामुळे पोलीस, वाहनधारकांत वादझाले.पोलिसांनी नेमले विशेष पथकवाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी एक विशेष पथक नियूक्त केले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सुशिक्षितांकडून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:30 AM