औरंगाबाद : रोशनगेट, बायजीपुरा आदी वसाहतींमध्ये महापालिकेने भूमिगत गटार योजनेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेने कोणत्याही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केली नाही. त्यामुळे दररोज लाखो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोणताही रस्ता बंद करण्यापूर्वी मनपाने अगोदर पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, मगच काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.चंपाचौक येथे दोन महिन्यांपूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होते. या कामामुळे परिसरातील रस्ता सुमारे १५ दिवस बंद होता. नंतर चंपाचौक ते रोशनगेट या रस्त्यावरील एक बाजू दोन महिने बंद ठेवण्यात आली. मागील आठ दिवसांपासून रोशनगेट ते मदनी चौकाकडे जाणारा प्रमुख रस्ता बंद करण्यात आला आहे. बायजीपुरा येथील मुख्य रस्ताही बंद केला आहे. शहा बाजारहून चंपाचौकाकडे येणारा रस्ता चार दिवसांपासून बंद केला. काल रात्री सुरू असलेला रस्ता दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक बंद होतो. कोणता रस्ता किती दिवस बंद राहणार याची कोणतीही पूर्वसूचना मनपा नागरिकांना देत नाही. एखादा रस्ता बंद केल्यावर त्या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता आहे किंवा नाही, याचा अजिबात विचार करण्यात येत नाही. अचानक रोशनगेट, बायजीपुरा, चंपाचौक आदी भागांतील प्रमुख रस्ते बंद झाल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.रोशनगेटकडून मदनी चौकाकडे २४ तासंत ५० ते ६० हजार वाहनधारक ये-जा करतात. मनपाने भूमिगत गटार योजनेसाठी रस्ता बंद केल्याने नागरिकांना बारी कॉलनी येथील अरुंद रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. या अरुंद रस्त्यावर दिवसभरातून एक हजार वेळेस वाहतूक कोंडी होत आहे. या गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना मागील पंधरा दिवसांपासून अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या अरुंद गल्लीच्या तोंडावर काही व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे एक रिक्षाही येथून व्यवस्थित ये-जा करू शकत नाही.चंपाचौक ते रोशनगेट या प्रमुख रस्त्यावर भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने एका बाजूने रस्त्याचे मजबुतीकरण सुरू केले आहे. हे काम एवढ्या संथगतीने सुरू आहे की, पावसाळ्यापूर्वी काम संपण्याची कोणतीही शक्यता नाही. पावसाळा सुरू झाल्यावर पुन्हा चार महिने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.
वाहतूक कोंडीचा झाला कहर
By admin | Published: May 29, 2016 12:19 AM