लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने सकाळी महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही आणि रात्री उशिरा घरी पोहोचतो. अभ्यासापेक्षा रेल्वे कधी येणार,याचा अधिक ताण येत असल्याचे म्हणत सोमवारी विद्यार्थिनींनी रेल्वेस्टेशन व्यवस्थापकांना घेराव घातला.काचीगुडा-मनमाड पॅसेंजर, निजामाबाद-पुणे पॅसेंजर, धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस मागील काही दिवसांपासून विलंबाने धावत आहे. या रेल्वेने लासूर, रोटेगाव, करंजगाव, जालना, परतूर आदी ठिकाणांहून शिक्षणासाठी औरंगाबादला दररोज ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेंना उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना विशेषत: विद्यार्थिनींना अधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून त्रास होत असल्याने अखेर सोमवारी सायंकाळी विद्यार्थिनींचा संयम सुटला. थेट स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे यांचे कार्यालय गाठून विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला.सकाळच्या वेळेतील रेल्वे उशिरा धावल्यामुळे महाविद्यालयात उशिराने पोहोचतो. अशावेळी ग्रंथालयात बसावे लागते. घरी गेलो तर घरातील काम करावे लागते. त्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे. रेल्वेस्टेशनवरील प्रतीक्षालयात बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे रेल्वेंना उशीर झाल्यानंतर दोन-दोन तास उभे राहावे लागते. रेल्वे उशिरा धावल्याने विद्यार्थिनींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे अंकिता जैस्वाल, पूर्वा शर्मा म्हणाल्या. ए.एस. क्लबमार्गे वाहतूक सुविधांनी जाणे परवडणारे नाही. शिवाय एकट्याने प्रवास करता येत नाही. त्यामुळे रेल्वेगाड्या वेळेवर सोडण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली. यावेळी विद्यार्थिनींनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास माहिती दिली जाईल, असे जाखडे म्हणाले. यावेळी किरण खेतरे, मयुरी चव्हाण, लता लोखंडे, गायत्री जैस्वाल, उज्ज्वला सूर्यवंशी, क्षितिजा निकम, प्रीती जैस्वाल, कोमल अधिकार, अमृता लेकुरवाळे, सुषमा देशमुख, मुक्ता देशपांडे आदी विद्यार्थिनींसह रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी आदी उपस्थित होते.
अभ्यासापेक्षा रेल्वेचा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:54 AM