औरंगाबाद : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत उमेदवारांना उत्तरे सांगण्याच्या प्रकणात अटक केलेला शहर पोलीस दलातील कर्मचारी राहुल उत्तम गायकवाड (३३, रा. मिलकॉर्नर, पोलीस वसाहत) हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीमधील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.
१९ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ७२० पदांसाठी राज्यात भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी अंदाजे ७६ हजार युवकांनी अर्ज दाखल केले होते. ही परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांत पार पडली. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्ल्युरिज पब्लिक स्कूल केंद्रामध्ये परीक्षार्थी नितीन जगन्नाथ मिसाळ (२६) याच्या मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सापडले होते. त्याने बॅगमधील ओळखपत्र घेऊन येतो, अशी बतावणी करून केंद्रातून पळ काढला होता. अधिक तपासात त्याला उत्तरे सांगण्यासाठी तत्पर असलेला रामेश्वर दादासाहेब शिंदे (२४, रा. औरंगाबाद) याचा हिंजवडी पोलिसांनी शोध घेतला.
त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत अशा प्रकारचे डिव्हाईस आणखी कोणी-कोणी तयार केले, याबाबत माहिती समोर आल्यावर गणेश रामभाऊ वैद्य (२५, रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) याला सोमवारी (दि. २१) शहरातील भोईवाड्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर वैद्यला उत्तरे सांगणाऱ्या राहुल गायकवाडलाही पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले होते. सर्वांना २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील राहुल गायकवाड हा २०१२ साली औरंगाबाद शहर पोलीस दलात भरती झालेला आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीत प्रवेश घेणाऱ्या युवकांना उत्तीर्ण करण्याचे रॅकेटही गायकवाड चालवत असावा, असा संशय हिंजवडी पोलिसांना आहे. त्यादृष्टीने चौकशी करती असल्याची माहिती पोलिसांनी दिली.