औरंगाबाद : बीड बायपास रोडवर पूल आणि रोडचे काम करण्याअगोदर सर्व्हीस रोड तयार केला नाही. त्यामुळे सध्या याठिकाणी सर्व्हीस रोडचे त्रांगडे झाले असून, वाहनचालकांना जीवघेण्या खड्ड्यांतूनच मार्ग शोधावा लागत आहे.
कंपनी किंवा कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. स्वत:चे वाहन कितीही सावकाशपणे चालवित असले तरी बेशिस्तपणे वाहने दामटणाऱ्यांना अडविणार कोण, असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित झाला आहे. शाळा व क्लाससाठी मुलांना एकटे पाठविणे पालकांची चिंता वाढविणारी आहे. मनपाने अडसर ठरणाऱ्या मालमत्ता हटविल्यानंतर सर्व्हीस रोडचे काम करण्यास दिरंगाई केली. देवळाईपासून महानुभाव चौकापर्यंत सर्वच रस्ता रिकामा करण्यात आला असला तरी अनेकदा वाहने रस्त्यातच उभी असतात. त्याकडे लक्ष न देता पोलिसांचे वाहनधारकांच्या मास्कवर जास्त लक्ष असते.
किती बळी घेणार?
बायपासवरील रस्ता व पुलाचे काम सुरू असल्याने अनेक जीव घेणारे खड्डे तयार झाले आहेत. प्रत्येक वाहन त्यात आदळत असल्याने चालकांचा वाहनावरील ताबा सुटून गंभीर अपघात घडले आहेत. ते खड्डे अजून किती बळी घेणार असा प्रश्न आहे. खड्डे बुजविण्याचा प्रशासनाला व ठेकेदारालाही विसर पडलेला आहे.
- स्मिता पटारे
अंतर्गत रस्ते चिखलात
बीड बायपास परिसरातील छत्रपतीनगर, अलोकनगर, माऊलीनगर, नाईकनगरातील विविध वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. बायपासवर वाहन चालवितांना गंभीर घटनांना सामोरे जावे लागते. अपघात टाळण्यासाठी सूचना फलक लावण्यात यावे.
- ॲड. वैशाली कडू
कॅप्शन... बीडबायपासवर जीवघेण्या खड्ड्यांतून वाहने चालविण्याची चालकांना कसरत करावी लागते. (छाया- शेख मुनीर)