छत्रपती संभाजीनगर : गृहविभागातर्फे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी डॉ. विनयकुमार राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील बारा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सध्याचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या जागी राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.
राठोड सध्या ठाणे शहराच्या वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रामनाईक तांडा, हाडोळी येथील असलेले राठोड यांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. ठाण्यामध्ये काही महिने परिमंडळ ५ चे उपायुक्त राहिल्यानंतर त्यांना वाहतूक विभागाचा पदभार देण्यात आला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर राठोड राज्यभरात चर्चेत आले होते.
आयपीएस उपायुक्तांच्या बदल्यांकडे लक्षशहरातील आयपीएस उपायुक्त नितीन बगाटे व नवनीत काँवत यांच्याही पदोन्नतीसह बदल्या प्रलंबित आहे. बुधवारच्या बदल्यांमुळे येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील आणखी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात प्रामुख्याने बगाटे व काँवत यांना अधीक्षक म्हणून कुठला जिल्हा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कलवानिया यांची प्रभावी कार्यकाळ२० एप्रिल, २०२२ रोजी मनिष कलवानिया जिल्ह्याच्या अधीक्षकपदी रुजू झाले होते. जवळपास २८ महिने कलवानी यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ प्रभावी राहिला. यात प्रामुख्याने त्यांनी ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी सुरू केलेले मोफत कौशल्य प्रशिक्षण राबवून नोकरी मिळवून देण्याच्या मोहिमेमुळे १०० पेक्षा अधिक बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली. बुधवारच्या बदल्यांमध्ये मात्र कलवानिया यांच्यासह आयपीएस श्रीकृष्ण कोकाटे, नंदकुमार ठाकूर यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.