औरंगाबाद : कर्नाटकच्या बेळगाव येथून चोरट्या मार्गाने पशुखाद्याच्या आडून टेम्पोमधून आणलेला सुमारे ७ लाखांचा गुटखा उस्मानपुरा पोलिसांनी सापळा रचून बुधवारी मध्यरात्री जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.
शिवहर गोपाळराव मालशिखरे (४०, रा. न्यू गणेशनगर, गारखेडा परिसर), वाहनचालक श्याम पांडुरंग वाघमारे (२०, रा. शिवाजीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. राज्यात गुटखा बंदी आहे. असे असताना औरंगाबाद शहरात चोरट्या मार्गाने गुटखा आणला जातो. हा गुटखा शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचविला जातो. अशाच प्रकारे बुधवारी रात्री एका टेम्पोतून शहरात गुटखा आणला जात असल्याची माहिती खबऱ्याने उस्मानपुरा पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त दीपक गिºहे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, हवालदार अशरफ सय्यद, सतीश जाधव, संतोष शिरसाठ आणि प्रकाश सोनवणे यांच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांना सोबत घेऊन उस्मानपुऱ्यात सापळा रचला. तेव्हा मध्यरात्री नाशिक येथून टेम्पो येताना त्यांना दिसला. पोलिसांनी टेम्पो अडवून झडती घेण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये ढेप (पशुखाद्य) असल्याचे आरोपी सांगत होते. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता ढेपीच्या आडून गुटखाच्या गोण्या लपवून आणल्याचे दिसले. ४२ गोण्यांमधून ७ लाखांचा गुटखा आणल्याचे स्पष्ट झाले. ७ लाखांचा हा गुटखा आणि टेम्पो जप्त केला.