लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरासह जिल्ह्यात ट्रॅव्हल्सवाल्यांनी खुलेआम दुकानदारी करीत सर्वसामान्यांची अडवणूक करून जादा तिकीट दर आकारत आर्थिक लूट सुरू केली आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. मागील चार महिन्यांत कारवाईच झाली नसल्याचे समोर आले असून, ट्रॅव्हल्सवाल्यांना वाहन निरीक्षकांचे अभय असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात ५५ ते ६० ट्रॅव्हल्स बसला उपप्रादेशिक कार्यालयाकडून प्रवासी वाहतुकीची परवानगी असल्याचे सूत्रांनी सांगितले; परंतु वास्तवात जिल्ह्यात १०० ते १५० ट्रॅव्हल्स बस खुलेआम प्रवाशांची आर्थिक लूट करून सुसाट धावत असल्याचे दिसून येते. याकडे वाहन निरीक्षकांचे दुर्लक्ष होत आहे. या कार्यालयात केवळ ‘निकम्मे’ अधिकारी आणून बसविले आहेत. त्यांच्याकडून कसलीच कारवाई न करता गैरप्रकारांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून केला जात आहे. अशा या ूूूबेजबाबदार अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस गैरप्रकार वाढत आहेत. त्यांची चौकशी करुन कारभार सुधारावा व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी येथे येणा-या सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
वाहन निरीक्षकांचे ‘ट्रॅव्हल्स’ला अभय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:05 AM