औरंगाबाद : पाण्याचे टँकर वाहतूक नियमाप्रमाणे करा, पाणीपुरवठा करता म्हणून कोणतीही सवलत पोलिसांकडून मिळणार नाही, असा सज्जड दम शहर वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे यांनी दिला. एवढेच नव्हे तर पाण्याच्या टँकरची दररोज तपासणी केली जाणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.
जयभवानीनगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. वर्षभरापूर्वी सिडकोत महाविद्यालयीन तरुणीला टँकरचालकाने चिरडल्याची घटना घडली होती. पाण्याचे टँकरचालक हे नियम पायदळी तुडवून वाहतूक करतात, अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी वाहतूक विभागाकडे आल्या होत्या.
दरम्यान, आजची दुर्दैवी घटना समजताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त काकडे यांनी शहरातील पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरचालक-मालकांची बैठक घेतली.
बैठकीत काकडे म्हणाले की, पाणी वाहतूक करणाºया टँकरचालकाने नियमानुसार वाहन चालवावे. पाणीबाणी परिस्थिती आहे, म्हणून कोणत्याही टॅँकरचालकास पोलिसांकडून सहानुभूती मिळणार नाही. वाहन मर्यादित वेगाने चालवावे, विना लायसन्स वाहन चालवू नये, वाहनांवर नंबर प्लेट चारही बाजूने असावी, वाहनांवर परावर्ती पट्टी लावावी, टँकरचालकासोबत एक मदतनीस ठेवा, दारू पिऊन वाहन चालवू नका, वाहनाची कागदपत्रे सोबत बाळगा, टँकरची गळती रोखावी आदी अशा सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय १३ जूनपासून वाहतूक पोलिसांकडून पाण्याच्या टँकरची दररोज अचानक तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.
या बैठकीला पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, नाथा जाधव, शरद इंगळे, अशोक मुदीराज आदींची उपस्थिती होती.