औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीपुरती यंदाही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाडेवाढ केली आहे. विविध मार्गांवरील बसगाड्यांचे आरक्षण ‘हाऊस फुल’ झाल्याने या मार्गांवर सोडण्यात येणाऱ्या जादा बससाठी अधिक भाडे वाढवल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्या सांगत आहेत.दिवाळीच्या सुटीमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची तयारी सुरू झाली असून खाजगी बसने प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे तिकीट आरक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांद्वारे औरंगाबादहून नागपूर, मुंबई, लातूर, सोलापूरसह इंदोर, हैदराबाद, अहमदाबाद अशा आंतरराज्य आणि विविध मार्गांवर बससेवा चालविली जाते. शहरातून दररोज विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या औरंगाबाद- नागपूर मार्गावर जवळपास २०, तर औरंगाबाद- मुंबई मार्गावर ३० बस धावतात. या दोन मार्गांवर ट्रॅव्हल्स बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असल्याचे दिसून येते. आगामी दोन ते तीन दिवसांत दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. दिवाळीमुळे २१ ते २२ आॅक्टोबरदरम्यान अनेक मार्गांवरील ट्रॅव्हल्स बसचे आरक्षण फुल झाले आहे. त्यामुळे या मार्गांवर प्रवाशांची संख्या आणखी वाढल्यास जादा बस सोडण्यात येणार आहेत; परंतु प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिवाळीच नव्हे तर एरव्हीही ऐन सुट्यांदरम्यान खाजगी बस व्यावसायिकांकडून भाडेवाढ होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जाते.
दिवाळीच्या मुहूर्तावर ‘ट्रॅव्हल्स’ची भाडेवाढ
By admin | Published: October 19, 2014 12:30 AM