उस्मानाबाद : सन २०११-१२ मधील यात्रा अनुदानात अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षांसह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांविरूध्द २७ मार्च रोजी रात्री तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ मात्र, गुन्हा दाखल होऊन जवळपास २२ दिवसांचा कालावधी लोटला तरी पोलिसांना केवळ दोनच आरोपित पकडण्यात यश आले आहे़ उर्वरित आरोपि अद्याप फरार आहेत़ दरम्यान, काही आरोपितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, यावर २० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे़तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी यात्रा अनुदान सन २०११-१२ मध्ये झालेल्या अपहाराची तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत अपहाराच्या अनेक बाबी समोर आल्या होत्या़ या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करून पोलिसांमार्फत चौकशी करण्याचा अहवाल होता़ या प्रकरणात माने यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा केल्यामुळे २७ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, संबंधित नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष टेंगळे, तत्कालीन लेखापाल अविनाश राऊत, ठेकेदारांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित सर्वच आरोपित फरार झाले होते़ काही दिवसांनी पोलिसांनी एका ठेकेदाराला अटक केली़ तर त्यानंतर काही दिवसांनी बनावट शिक्के पुरविणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला जेरबंद केले़ काही आरोपितांनी अटकपूर्व अर्ज मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे़ या अर्जाच्या सुनावणीसाठी वाढीव तारखा मिळत आहेत़ आरोपितांच्या वकिलांनी युक्तीवादासाठी वाढीव मुदत मागितली होती़ त्यानुसार न्यायालयाने २० एप्रिल पर्यंत वाढीव मुदत दिली आहे.
यात्रा अनुदान घोटाळा; आरोपींचा सुगावा लागेना
By admin | Published: April 18, 2017 11:38 PM