छत्रपती संभाजीनगर : देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून नावाजलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ जालना, छत्रपती संभाजीनगरमार्गे धावण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नांदेड विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच ही रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर महिनाभरात जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिनसह जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारी केली जात आहे.
मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वे मार्गादरम्यान मनमाड-छत्रपती संभाजीनगर-जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जालना ते परभणीदरम्यानही विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मनमाड-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. जालन्यापर्यंत इलेक्ट्रिक इंजिन चालविण्याची चाचणीही लवकरच होणार आहे. ही चाचणी होताच जनशताब्दी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या, ‘वंदे भारत’साठी बरीच तयारी करावी लागते. रेकपासून ते मार्गापर्यंतचे नियोजन करावे लागते. त्याचे नियोजन आणि लॉन्चमध्ये बरेच बारीकसारीक तपशीलचा समावेश असतो. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार काम केले जाईल.
कधी पूर्ण होणार विद्युतीकरण?नांदेड ते मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. तर सिकंदराबादसाठी ही एक्स्प्रेस सुरू होऊ शकते. नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती.
विद्युतीकरणानंतर धावेल वंदे भारतवंदे भारत एक्स्प्रेस ही इलेक्ट्रिकवर धावते. त्यामुळे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होईल. छोट्या अंतरावर ही रेल्वे चालविणे परवडत नाही. जनशताब्दी एक्स्प्रेस इलेक्ट्रिक इंजिनसह धावेल. त्यादृष्टीने ट्रायल सुरू आहे.- रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री