औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून खाजगी ट्रॅव्हल्सने औरंगाबादेत आलेल्या महिलेचे बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पावणेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना १७ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो तुळजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.
उस्मानाबाद येथील तक्रारदार महिला ही १७ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथून औरंगाबादकडे येण्यासाठी श्रीराम टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसल्या. १८ एप्रिलच्या सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या औरंगाबादेत आल्या.
प्रवासादरम्यान त्यांच्याजवळील पर्समध्ये दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ, पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या (पाटल्या), सहा तोळ्याच्या चार बांगड्या आणि रोख एक हजार रुपये असा सुमारे ३ लाख ७० हजारांचा ऐवज होता. हा ऐवज प्रवासादरम्यान चोरट्यांनी चोरून नेला. ही बाब औरंगाबादेत उतरल्यानंतर महिलेच्या लक्षात आली. महिलेने याविषयी लगेच तक्रार न करता ४ मे रोजी वेदांतनगर ठाण्यात धाव घेतली. ही घटना तुळजापूर येथे घडलेली असल्याने पोलिसांनी महिलेची फिर्याद नोंदवून घेत पुढील तपासासाठी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविली.