आडूळ (छत्रपती संभाजीनगर) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात टायरचे पंक्चर काढण्यासाठी उभ्या केलेल्या पिकअपला ट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअप उलटल्यानंतर त्यामधील गोळ्या, बिस्कीट अन् सोनपापडी लुटण्यासाठी वाटसरूंची झुंबड उडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात शनिवारी दुपारी ३ वाजेच्या छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाचे (एम एच २०,ई जी १०३७ ) टायर पंक्चर झाले. त्यामुळे वाहन रस्त्यावरच उभे करून चालक पंक्चर काढण्यासाठी टायर घेऊन बाजूच्या दुकानात गेला होता. नेमके त्याच वेळेस पाठीमागून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने (एच आर ३७,ई १७४६ ) उभ्या पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला तर पिकअप वाहन रस्त्यावरच उलटले. यावेळी अपघातग्रस्त पिकअपमधील बिस्किटे, चाॅकलेट, गोळ्या, गुलाबजामुन, सोनपापडी, म्हैसूर पाक आदी वस्तूंच्या बरण्या व इतर साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते. त्यामुळे उपस्थित वाटसरू व ग्रामस्थांनी जखमीला मदत करण्याऐवजी हे साहित्य लुटण्यात धन्यता मानली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांची गर्दी वाढली. काही वाहनधारकांनी वाहन थांबवून हे साहित्य उचलून नेले.
पोलिसांना पाहून ग्रामस्थ पसारया घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पाहून उपस्थित ग्रामस्थ पसार झाले. या अपघातात पिकअपमधील किती साहित्य पळवले गेले हे पोलिस तपासात निष्पन्न होईल. मात्र याप्रकरणी ट्रक मालक आला नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. ट्रक मालकाच्या तक्रारीनंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.