- साहेबराव हिवराळे वाळूज महानगर (औरंगाबाद ) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे साजापूर-शरणापूर या रस्त्यावर साडेचार किलोमीटर रस्ता पार करताना पाऊणतासाची जीवघेणी कसरत करावी लागते. यामुळे या मार्गाचा वापर करणारे कामगार आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून अनेकदा निविदा काढून रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्त्यावर टाकलेले खडी व मुरमाचे ढीग वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. काही ठिकाणी काम चालू तर काही ठिकाणी काम बंद असल्याने एकाच वेळी एक वाहन जाऊ शकते; परंतु विरुद्ध बाजूने येणार्या वाहनामुळे वाहतूक जाम होते. त्याचा फटका कामगार व पर्यटकांना बसतो. औद्योगिक वसाहत असल्याने कारखान्यात कच्चा व पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी येणार्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दुचाकीवर ये-जा करणार्या कामगारांना जीव मुठीत घालून जावे लागते. अनेकदा वाहने घसरून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. पर्यटक व भाविकांना गैरसोयींना सतत तोंड द्यावे लागत आहे.
दौलताबाद ते वाळूज औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे साजापूर-शरणापूर या रस्त्यावर वाहनधारकांची सतत वर्दळ असते. मात्र, रस्ता कामात कासवगती असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाकडे रस्त्याविषयी जोर लावल्याने रस्ता मंजूर झाला. त्यासाठी ५ कोटींची मंजुरी आली. निविदा पुन्हा टाकून काम पूर्ण करण्यासाठी वेळदेखील मागून घेण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग गंगापूरच्या हद्दीत येत असल्यामुळे या विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षे रस्ता दुरुस्तीची जबाबदारीही संबंधित ठेकेदाराकडे सोपविण्यात आली होती.
औद्योगिक क्षेत्राशी जोडणारा प्रमुख रस्तासार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे तीन वर्षांपासून काम रेंगाळले असून, नागरिकांत असंतोष आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्राशी जोडणारा प्रमुख आणि जवळचा मार्ग असल्याने २४ तास नागरिक व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे कामाची गती वाढवून ते पावसाळ्यापूर्वी संपवावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य विजय जाधव, शेख इस्माईल, मुनीर पटेल, रज्जाक पठाण, शेख राजू आदींनी दिला आहे.
पर्यटकांना नगर नाक्यामार्गे वळसावाळूज महानगर परिसरातील नागरिकांना शरणापूर भांगशीमातागड, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ तसेच शहरात जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने सतत वर्दळ असते; परंतु रस्त्यावरील खडीचे ढिगारे, मुरूम मातीचा अडसर असल्याने अपघात टाळण्यासाठी पर्यटक व भाविक नगरनाकामार्गे वळसा घालून जात आहेत. औद्योगिक क्षेत्रात येणार्या कामगारांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. - राणूजी जाधव, माजी पंचायत समिती सदस्य
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करारस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता या रस्त्याच्या मजबुतीकर-णाच्या कामाचा उरक वाढविणे गरजेचे आहे. अनेकदा उद्घाटने होऊन काम संथगतीने सुरू आहे. ग्रामस्थांना घर गाठताना गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागते. वरिष्ठांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करूनदेखील कामात फरक पडलेला नाही. पर्यटक व कामगार नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.- सर्जेराव पाटील चव्हाण, माजी सभापती, पंचायत समिती
‘आरटीओ’कडे जाणारे त्रस्तशहरातील आरटीओ कार्यालयाचे कामकाज शरणापूर हद्दीत सुरू झाल्याने शहरातून दररोज येणार्या वाहनाला देखील आदळआपटीचा त्रास सहन करीत यावे लागते. काही डॅमेज असल्यास आरटीओकडूृन वाहनधारकांना पुन्हा अडचणीला तोंड द्यावे लागते. त्याकडेही अधिकारी यांच्या सोबत अनेकदा वादाचे प्रकार वाढले आहेत.- अनिल जाधव, ग्रा.पं. सदस्य