- विजय सरवदे
औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला औरंगाबाद- सिल्लोड- जळगाव चारपदरी राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तत्पूर्वी, औरंगाबाद ते सिल्लोड हा महामार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा औरंगाबाद -सिल्लोड या चारपदरी महामार्गाचे नियंत्रक जयंत चिव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पर्यटन आणि दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा- जळगाव या रस्त्याचे चौपदरी करण्याची दोन-अडीच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती. २९ जुलै २०१७ रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर भूसंपादन व सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, निधी थकल्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी नेमलेल्या हैदराबाद येथील ऋत्विक या कंत्राटदार कंपनीने काम अर्धवट सोडून दिले. ही बाब सजग नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी औरंगाबाद खंडपीठानेही या रस्त्याच्या कामाची स्वत:हून दखल घेतली. त्यामुळे न्यायालयाला कामाच्या प्रगतीचा आढावा अधिकाऱ्यांमार्फत दिला जात आहे.पहिल्या कंत्राटदाराने अर्धवट काम सोडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी तीन कंत्राटदार नेमले. यामध्ये औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंतच्या रस्त्यासाठी आर. के. चव्हाण, सिल्लोड ते फर्दापूरपर्यंत आर. एस. कामटे, तर फर्दापूर ते जळगावपर्यंत स्पायरा इन्फ्रा भटनागर या कंत्राटदारांचा समावेश आहे.
या महामार्गासाठी ४३१ कोटी रुपयांचा निधीसध्या औरंगाबाद- सिल्लोड रस्त्याच्या एका बाजूचे (लेन) काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. साधारणपणे ६० किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी सध्या दोन पेव्हर मशीन कार्यरत आहेत. साधारणपणे मोठे पेव्हर मशीन दिवसाला ५०० मीटर, तर लहान पेव्हर मशीन ३०० मीटर एवढे काँक्रिटीकरणाचे काम करत आहे.४एक लवकर पूर्ण होईल व त्यावरून वाहतूक सुरू होईल. त्यामुळे दुसऱ्या लेनच्या कामासाठी फारसे अडथळे येणार नाहीत. मार्चअखेरपर्यंत दोन्ही लेनची कामे पूर्ण होतील. यासोबतच सिल्लोड-फर्दापूर व फर्दापूर-जळगाव या टप्प्याची कामे पूर्ण होतील. या रस्त्यावर चार मोठे पूल व लहान-मोठ्या कामांसाठी साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंतचा कालावधी लागेल. त्यानंतर हा रस्ता सर्वार्थाने वाहतुकीसाठी परिपूर्ण होईल. या रस्त्यासाठी सुरुवातीला ३२१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. आता कामांमध्ये वाढ झाली असून, निधीमध्ये ११० कोटी रुपयांची भर पडली आहे, असे कार्यकारी अभियंता चिव्हाणे यांनी सांगितले.