औरंगाबाद : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दीड महिन्यांनंतर सोमवारपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. येथे ४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल झाले असून सध्या १२५ खाटांची व्यवस्था केली आहे.
जिल्हा रुग्णालयात गतवर्षी ३० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. तेव्हापासून याठिकाणी केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. ऑक्टोबरनंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली होती. ६ जानेवारीला येथून शेवटचा रुग्ण बाहेर पडला होता. त्यानंतर येथे बाह्यरुग्ण विभाग आणि प्रसूती विभागाची सेवा पुन्हा एकदा सुरू झाली. अन्य विभागही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतु, या सगळ्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज झाले आहे. रुग्णालयात ४ रुग्ण भरती झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
रुग्णालयाबाहेर लागला फलक
कोरोनाची संभाव्य दुसरी लाट गृहीत धरून उद्यापासून बाह्यरूग्ण विभाग हा बंद राहील व हे रुग्णालय ''डीसीएचसी'' म्हणून कोविड-१९ करिता पूर्णवेळ सुरू राहील, असा फलक जिल्हा रुग्णालयाबाहेर लागला आहे, पण ओपीडी बंद करण्याचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. रुग्णसंख्या वाढल्यास ओपीडी बंद केली जाणार आहे.