वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील खुल्या भूखंडावरील झाडाची अज्ञाताकडून चोरी-छुपे कत्तल केली जात आहे. संपूर्ण वाढलेल्या डेरेदार झाडावर कुऱ्हाड चालविली जात असल्याने पर्यावरण प्रेमीत असंतोषाचे वातावरण आहे. ग्रीन बेल्टवरील या झाडांच्या कत्तलीकडे एमआयडीसीही कानाडोळा करीत असल्याने पर्यावरणप्रेमींतून आश्चर्य व्यक्त केले आहे.
एमआयडीसीच्या वतीने उद्योजक संघटना, कंपन्यांचे अधिकारी-कर्मचारी व उद्योजक यांच्या मदतीने अनेक वर्षांपासून स्वच्छ व हरित एमआयडीसी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्योजक संघटनांनी श्रमदान करीत उद्योगनगरीतील मोकळे भूखंड, रस्ते आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत वृक्षारोपण मोहीम राबविली होती. या झाडांना वेळेवर पाणी व त्यांची निगा चांगल्या पद्धतीने राखली गेल्याने अनेक झाडे डेरेदार झाली आहेत. या मोहिमेमुळे उद्योगनगरीत प्रदूषणाचा धोकाही कमी झाला आहे.
मात्र, वैष्णोदेवी उद्यान रोडलगत असलेल्या ग्रीन बेल्टमधील झाडे गत चार ते पाच दिवसांपासून तोडण्यात येत आहेत. संपूर्ण वाढ झालेली ही झाडे तोडण्यात येत असल्याने पर्यावरण प्रेमीत नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो ओळ
वाळूज उद्योगनगरीतील वैष्णोदेवी उद्यान रोडवर असलेल्या खुल्या भूखंडावरील डेरेदार झाडांची अशाप्रकारे कत्तल केली जात आहे.