छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समीक्षा खंडारे या ३५ वर्षीय महिलेने मंगळवारी दुपारी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. स्काऊट ॲण्ड गाईड कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत निवारा करण्यासाठी सुरू केलेले कच्चे बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काढल्यामुळे संतप्त होऊन त्या महिलेने पेटवून घेतले. यात गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा उपचारदरम्यान घाटीत रुग्णालयात मृत्यू झाला.
कारवाईपूर्वी त्या महिलेला अतिक्रमण हटाव पथकाने उचलून नेत दुसरीकडे सोडले. त्यानंतर ती पुन्हा तेथे आल्यावर मनपाने तिच्या वस्तू उचलून नेल्याचे लक्षात आल्यावर तिने अंगावर रॉकेल घेत पेटवून घेतले. हा भयंकर प्रकार पाहून प्रत्यक्षदर्शींचा थरकाप उडाला.दरम्यान, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूचनेनुसार निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी या घटनेप्रकरणी पूर्ण माहिती गृह शाखेकडून घेतली. या महिलेची कुठलीही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. उलट त्या महिलेविरोधात काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेकीच्या तक्रारी केल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग व्यक्तीचे उपोषण सुरू असून, त्याबाबत महापालिकेला पत्र देण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांनी सांगितले. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
सुरक्षा व्यवस्थेची दक्षता शून्य....जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कट्टा आहे. तेथे विविध मागण्यांसाठी रोज कुणी ना कुणी आंदोलन, निदर्शने, उपोषण करीत असते. समीक्षा खंडारे ही महिला दोन महिन्यांपासून कार्यालयासमोर अतिक्रमण करून राहत होती. ती कोण आहे, तेथे कशी काय राहते, तिला भेटायला कुणी येतं की नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून काहीही माहिती घेण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या समोर असे प्रकार होत असल्यामुळे त्या भागासाठी दिलेले पोलिस काय करीत होते? प्रशासनाने का दखल घेतली नाही? असे सवाल उपस्थित झाले आहेत. सुरक्षा व्यवस्थेची दक्षता शून्य असल्याचे यातून स्पष्ट होते.
रॉकेल कुणी आणून दिले?रॉकेलचा पुरवठा बंद असताना त्या महिलेला रॉकेल कुठून मिळाले, असा प्रश्न आहे. ती महिला मनोरुग्ण असावी, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असला तरी तिला कुणी तरी टोकाचे पाऊल उचलण्यासाठी उचकावल्याची चर्चाही घटनास्थळी होती.