औरंगाबाद : शेतकऱ्यांना २४ तास भाजीपाला विकता यावा यासाठी जाधववाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेले शेतकरी बाजार संकुलाच्या साईडचे शेड कोसळले. वादळी वाऱ्याने समोरील व पाठीमागील बाजूला असलेले टीनचे शेड खाली कोसळले तेव्हा जोराचा आवाज झाला. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या परिसरात कोणी नव्हते, यामुळे जीवितहानी टळली.
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला अडत मार्केटमध्ये शेतकरी बाजार संकुल उभारले. ३५ हजार २३२ चौरस फूट एवढ्या जागेवर दोन मोठे डोम उभारण्यात आले. त्यांची उंची २५ फूट आहे. हे बाजार संकुल उभारण्यास अडीच कोटी रुपये खर्च आला आहे. ३ जानेवारी रोजी या संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. मात्र, तेव्हापासून शेतकरी बाजार या संकुलात भरलाच नाही. बाजार संकुलात दोन डोम तयार करण्यात आले. या डोमच्या दर्शनी बाजूला व पाठीमागील बाजूला टीनचे शेड उभारण्यात आले. रविवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे हे वरील बाजूला लावण्यात आलेले टीनचे शेड खाली कोसळले. वादळी वाऱ्याने सिमेंट काँक्रीटचे खांब उखडून शेड खाली कोसळले, तसेच पाठीमागील बाजूचेही शेड कोसळले. यामुळे बांधकामाची शंका निर्माण झाली.
सातारा देवळाई परिसरात पावसाने नुकसानरविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मृगाच्या पावसाचे आगमन झाले; परंतु अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने अडसर निर्माण झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे पडले. दुपारी चार ते रात्री ९ वाजेपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर सतत नागरिकांच्या तक्रारीचे फोन खणखणत होते. सातारा, देवळाईत शासकीय व निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, रविवार असल्याने शक्यतो बहुतांश अधिकारी व कर्मचारी घरीच होते; परंतु दुपारी ४ वाजेदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने परिसरात दाणादाण उडवून टाकली.
पावसाळापूर्व कामात दिरंगाईदरवर्षी मान्सूनपूर्व धोकादायक झाडांची कटिंग करण्यात येते. पावसात स्पार्किंग होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जाते. यंदा पावसाळा सुरू झाला तरीदेखील धोकादायक झाडांच्या फांद्या कापण्यात आलेल्या नाहीत, परिणामी नागरिकांना रात्रीपर्यंत अंधारात राहावे लागले. मान्सूनपूर्व कामात दिरंगाई करण्यात आल्यानेच वीज गुल झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम- महापालिकेने यंदा वेळेत मान्सूनपूर्व सफाईची कामे केली नाहीत. त्याचा परिणाम शहरात रविवारी झालेल्या केवळ ५.३ मि.मी. पावसात दिसून आला. नेहरूनगरातील ऐतिहासिक कटकटगेटसमोरील नाला तुंबल्यामुळे पुराच्या पाण्याने कटकट दरवाजालाच वेढा घातला. - नाल्याचे पाणी वाढून नजीकच्या घरात शिरण्याची भीती निर्माण झाल्यामुळे नागरिक रस्त्यावर आले व त्यांनीच हातात बांबू घेत, तुंबलेले नाले मोकळे करून घेतले. त्यामुळे पाणी वाहून गेले. - शहरात ठिकठिकाणी अशीच अवस्था आहे. यापेक्षा अधिक पाऊस झाला तर नाल्याच्या काठावरील अनेक वासाहतीमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. - गतवर्षी नारेगावातील वसाहतीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पुरात वाहून गेले होते. - नाला तुंबल्यानंतर पालिकेने तात्काळ जेसीबी पाठवून तेथे सफाई सुरू केली.