- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वैद्यकीय क्षेत्रात ३० ते ४० वर्षे रुग्णसेवा दिल्यानंतर येणाऱ्या अनुभवातून रुग्णांवर परिपूर्ण उपचार करणारे डॉक्टर म्हणून ओळख निर्माण होते. मात्र, गेल्या काही वर्षांत पुरावा आधारित उपचाराकडे (एव्हिडन्स बेस मेडिसिन, प्रॅक्टिस) कल वाढत आहे. यासाठी अनुभवाला पुराव्याची जोड देऊन रुग्णांवर उपचार देण्यावर भर दिला जात आहे.
एखाद्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर रुग्णाला लगेच गुण येतो, असा अनेकांचा अनुभव आहे. ३० ते ४० वर्षे एकाच डॉक्टरांकडे उपचार घेणारे अनेक जण आहेत. अगदी याचप्रकारे डॉक्टरांकडेही एकाच आजाराचे अनेक रुग्ण येतात. त्यामुळे कोणत्या आजारावर कोणते औषध चांगले आहे, कोणत्या पद्धतीच्या उपचाराने रुग्ण आजारातून लवकर बरा होतो, त्यानुसार कोणता उपचार केला पाहिजे, याचा अनुभव डॉक्टरांना येतो. त्यातून आजारांची लक्षणे, त्यावरून निदान, उपचार केले जातात. मात्र, याला कोणताही शास्त्रीय आधार नसतो. केवळ अनुभवावरून उपचार होतात. वैद्यकीय क्षेत्रात अनुभवापेक्षा पुराव्याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे पुरावा आधारित उपचार करण्याकडे आता प्राधान्य वाढत आहे.
वर्षानुवर्षे दिलेल्या वैद्यकीय सेवेतून आलेल्या अनुभवाला पुराव्याचा आधार दिला जात आहे. एखादा आजार का होतो, त्यावर कोणते उपचार आहेत, हे सिद्ध केले जात आहे. त्यासाठी संशोधनाचाही आधार घेतला जात आहे. त्याबरोबर पूर्वी डॉक्टरांनी सांगितले म्हणून एखादा आजार झाल्याचे निदान होत असे. परंतु आता विविध तपासण्या, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संबंधित आजार झाल्याचे स्पष्ट होते. या सगळ्यांबरोबर एखाद्या मोठ्या उपचार, शस्त्रक्रियेसाठी किमान तीन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
१९० पेपरचे सादरीकरणशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नुकतीच इरकॉन परिषद पार पडली. या परिषदेत तब्बल १९० पेपरचे डॉक्टरांनी सादरीकरण केले. हे सर्व पेपर म्हणजे डॉक्टरांनी केलेल्या उपचार, त्यांना आलेले अनुभव आणि रुग्णांना होणाऱ्या अनुभवाचा पुरावाच असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
शस्त्रक्रियेच्या वेळी सल्ला महत्त्वाचाएखाद्या डॉक्टरने मोठी शस्त्रक्रिया सांगितली, तर रुग्णांनी किमान ३ जणांचा सल्ला घेतला पाहिजे. अशा वेळी पूर्वीच्या डॉक्टरांनी सांगितलेली माहिती अन्य डॉक्टरांसमोर लपविता कामा नये. अनेकदा पहिल्या डॉक्टरने सांगितलेला निर्णय बदलू शकतो. मात्र, अन्य डॉक्टरांचा सल्ला केवळ मोठ्या शस्त्रक्रिया अथवा एखाद्या मोठ्या निर्णयाप्रसंगीच घेतला पाहिजे.- डॉ. संजय पटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन आॅफ औरंगाबाद
अनुभवाचे रूपांतर पुराव्यातएव्हिडन्स बेस मेडिसिन अथवा प्रॅक्टिस म्हणजे शास्त्रोक्त आधारित उपचार. हे अभ्यास करून, परीक्षणावर आधारित असते. अनुभवानुसार अनेक जण उपचार करतात. त्यातून रुग्णाला गुण येत असतो. परंतु त्याला काही आधार नसतो. त्यामुळे हा अनुभव पुराव्यात रुपांतरित केला पाहिजे. तंत्रज्ञानामुळे अचूक निदान होण्यास मदत होत आहे.- डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, क्ष-किरण विभागप्रमुख, घाटी