औरंगाबाद : सातारा गावात १३ मे रोजी जुन्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करताना महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सातारा पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
साबेर इसाक शेख, सुलतान सुलेमान पठाण, इरफान सुलेमान पठाण आणि तीन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, सातारा गावातील रहिवासी मकसूद खान हाफीज खान पठाण आणि आरोपीमध्ये जुना वाद आहे. या वादातून १३ जून रोजी मकसूद खान आणि त्यांच्या कुटुंबावर आरोपींनी हल्ला केला होता.
या घटनेत आरोपींनी तक्रारदार यांची पत्नी नसरीन यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. तसेच त्यांचा मुलगा आमेर, समेर, पत्नी नसरीन आणि परवीन यांना शिवीगाळ, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मकसूद खान यांनी दिली होती. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याविषयी सातारा पोलिसांना आदेश देऊन गुन्हा नोंदविण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक कोते तपास करीत आहेत.