दौलताबाद : गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या माळीवाडा येथील आदिवासी गोंड समाजाचा निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते सोमवारी (दि.८) भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी एल. जी. गायकवाड, पं. स. गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, प्रकल्प संचालक संगीता पाटील, सुदेश रोकडे, जि.प. सदस्य सय्यद कलीम, उपसभापती पंचायत समिती मालती पडुळ, पं. स. सदस्य वनिता मुळे, सरपंच अनिता हेकडे, उपसरपंच कडू कीर्तिकर, ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी कडू कीर्तिकर, गिरिजा भगत, मनीष गाजरे, कृष्णा मुळे, ग्रामविकास अधिकारी जी. व्ही. हारदे, मनोज शिरसाट उपस्थित होते.
माळीवाडा गावाजवळ असलेल्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागे आदिवासी गोंड समाजाचे लोक अनेक वर्षांपासून पाल टाकून राहतात. जडीबुटी, खारीक-खोबऱ्याचे पदार्थ गावोगावी जाऊन विक्री करून हा समाज उदरनिर्वाह करतो. या समाजाला दहा वर्षांपूर्वी 'ग्रामउदय से भारत उदय' योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत २७ घरकुले मंजूर करण्यात आली. तर गट क्रमांक १८७ मध्ये सोळा हजार पाचशे स्केअर फूट जमीन देण्यात आली. मात्र सदर घरकुल योजनेसाठी यापेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे. जागेची कमतरता असल्याने महिन्याभरापूर्वी डॉ. गोंदावले यांनी भेट देऊन ही घरे दुमजली बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दहा वर्षांपासून आदिवासी गोंड समाजाचा निवाऱ्यासाठीचा लढा आज पूर्ण झाला आहे.