सोयगाव : अजिंठ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी रामपूरवाडी गावातील पथदिवे वीजप्रवाह उतरल्यापासून बंद असल्याने गावातील अंधार दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क झाडावर दिवे बसवून त्या एकमेव पथदिव्यावर गावाचा अंधार दूर करण्यात येत असल्याने या कामासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, चक्क झाडावरील या पथदिव्याची देखभाल करण्यासाठी गावातील तरुणांनी कर्तव्य वाटून घेतले आहे.दुर्लक्षित आदिवासी रामपूरवाडी गावात मागील आठवड्यात सततच्या पावसाने गावातील वीज खांबामधील झालेल्या बिघाडाने गावात वीजप्रवाह उतरला होता. यावर महावितरणच्या पथकाने काळजी म्हणून गावातील पथदिव्यांची वीज खंडित करून बिघाड दुरुस्त करण्याचा मोठा प्रयत्न करूनही बिघाड दुरुस्त झाला नाही. अखेरीस महावितरणच्या पथकाने पथदिवे बदलविण्याचा निर्णय घेतल्याने नवीन पथदिव्यांचे वीज खानब मिळत नसल्याने आदिवासी रामपूरवाडी अंधारातच होते.यावर उपाययोजना म्हणून गाव परिसरातील सामुदायिक ठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडावर चक्क दिवा लावून गावातील अंधार दूर केला असल्याने हिरव्यागार झाडावरील सोनेरी प्रकाशाचा दिवा गावाचे आकर्षक बनला आहे. दरम्यान, जंगल भागात असलेल्या या रामपूरवाडीला वन्य प्राण्यांचा धोका आणि चोरांच्या अफवा यामुळे अंधारातील नागरिकांनी गावाला उजेडात आणण्यासाठी चक्क लिंबाच्या झाडावर स्वखर्चाने दिवा बसवून घरातील वीजजोडणी या दिव्याला दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे भय दूर झाले असल्याचे कैलास सोनवणे, चंद्रकांत गायकवाड, नारायण सोनवणे, सुकदेव पिंपळे आदींनी सांगितले.
आदिवासी रामपूरवाडीत जगावेगळे पथदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:23 AM