औरंगाबाद : तिला श्रद्धांजली अर्पण करताना काही जण नि:शब्द होते, तर काही जणांच्या भावना अनावर होत होत्या. अनेकांनी संताप व्यक्त केला. मेणबत्त्या पेटवून क्षणभर अंधार दूर होईल, पण अत्याचाराच्या स्वरुपात महिलांवर निर्माण झालेला खरा काळोख कधी दूर होणार? अमानवी प्रवृत्तीने बळी घेतलेल्या हिंगणघाटच्या पीडितेला श्रद्धांजली अर्पण करताना सोमवारी शहरात श्रद्धांजली सभेप्रसंगी महिला, युवतींसह तरुणांनी हा प्रश्न उपस्थित केला.
हिंगणघाट येथे पेटविण्यात आलेल्या युवतीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा निषेध करीत शहरातील विविध भागांमध्ये मेणबत्त्या पेटवून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. पैठणगेट येथील स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याच्या परिसरात सजग महिला संघर्ष समितीतर्फे श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, डॉ. रश्मी बोरीकर, मंगल खिंवसरा, पद्मा तापडिया, सुजाता पाठक, सुनीता जाधव, डॉ. मंजूषा शेरकर, हेमलता सोनटक्के, प्रतीक खडतकर, समीर देवकर, नितीन जोगदंड, संतोष सुरासे, पवन आडे, अर्जुन भूमकर, अतुल वाघमारे, प्रकाश हराळ, ओमकार आंबेकर, समाधान सोरमारे, नीलेश चौधरी, सागर इंगळे, असीम बेग, सीमा जिवरग, हेमलता सोनटक्के आदींसह युवक-युवतींची उपस्थिती लक्षणीय होती.
डॉ. रश्मी बोरीकर म्हणाल्या, आरोपीला ३० दिवसांच्या आत कठोर शिक्षा झाली पाहिजे. कायद्यावर विश्वास आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच ही शिक्षा झाली पाहिजे. मंगल खिंवसरा म्हणाल्या, शासन, पोलीस प्रशासन आणि न्यायालयाची लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलली पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा झाली तरच आदरयुक्त भीती निर्माण होईल.
शिक्षण क्षेत्रातील संघटनांतर्फे श्रद्धांजलीक्रांतीचौक येथे शिक्षण क्षेत्रातील संघटनांतर्फे औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठतर्फे मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. आरोपीला लवकरात लवकर मृत्युदंडाची शिक्षा व्हावी व अशा घटना भविष्यात घडू नये, कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी शिक्षक क्रांतीचे प्रा. मनोज पाटील, आनंद खरात, पांडुरंग गोकुंडे, मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल, मनोहर सुरगुडे, भास्कर म्हस्के, नालमवार, अवद चाऊस, देवानंद वानखेडे, सुदर्शन पवार, नामदेव थोटे, शिरीष जाधव, भगवान पाटील, सचिन मिसाळ, प्रदीप विखे, प्रल्हाद शिंदे, संतोष जाधव, सुरेखा शिंदे, संध्या काळकर, सुरेखा शिंदे, संभाजी काळे, विजय नागरे, किशोर चव्हाण, सुनील औटे आदी उपस्थित होते.
यासाठी स्वातंत्र्य मिळविले?स्वातंत्र्यसैनिक म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त क रते. परंतु आम्ही हे पाहण्यासाठी स्वातंत्र्य मिळविले का, यासाठीच आम्ही धडपड केली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. - ताराबाई लड्डा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी
आजही भीती वाटतेआरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आजही घराबाहेर एकटे जात असताना भीती वाटते. भीतीच्या वातावरणाची ही परिस्थिती कधी बदलणार, असा प्रश्न आहे. - हेमलता सोनटक्के