औरंगाबाद : औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ स्वप्नील लोणकर या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऐनवेळी अ.भा.वि.प.चे पदाधिकारी व काही क्लासेस चालक घुसले आणि त्यांनी राज्य लोकसेवा आयोग व सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, श्रद्धांजलीच्या या सभेचे आंदोलनात रूपांतर झाले. तेव्हा पोलिसांनी पदाधिकारी व काही विद्यार्थ्यांची धरपकड करीत त्यांना ताब्यात घेतले. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने दोन दिवसांपूर्वी पुणे येथे आत्महत्या केली. परीक्षा घेण्याबाबत राज्य लोकसेवा आयोगाचे सातत्य राहिले नाही. कोरोनाचे कारण देत सतत परीक्षा पुढे ढकलल्या जातात. झालेल्या परीक्षांचे निकाल लावले जात नाहीत. निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान, नैराश्याच्या गर्तेतून सापडलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली, अशी भावना व्यक्त करीत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपत येत असतानाच तिथे अभाविपचे महेंद्र मुंडे, दीक्षा पवार तसेच काही क्लासचालक तिथे आले व त्यांनी एमपीएससी परीक्षेच्या उदासीनतेबद्दल राज्य लोकसेवा आयोग व राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. तेवढ्यात पोलिसांचा मोठा ताफा तेथे पोहोचला व त्यांनी आंदोलक विद्यार्थी व अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे तेथे उपस्थित विद्यार्थी निघून गेले. त्यानंतर विद्यार्थी व क्लासचालकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळपत्रक पाळावे, अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
चौकट.....
... अन्यथा राज्यभर आंदोलन उभारले जाईल
विधानसभेच्या अधिवेशनात सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका तरुणाची आत्महत्या झाल्यानंतर एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना जुलैअखेर नियुक्त्या देणार, अशी घोषणा केली आहे. घोषणेप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
कॅप्शन :
औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करताना महेंद्र मुंडे, गजानन पालवे, तुषार साळुंखे, भूपेश कडू व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी.