शेख निसार शेख महमंद, वसीम अजीज कुरेशी (वय २२) आणि सोहेल युसूफ कुरेशी (२३, सर्व रा. करंजखेडा, ता. कन्नड) अशी चोरट्यांची नावे आहेत. ग्रामीण गुन्हे शाखेकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार दीपक कैलास वाघ (रा. करंजखेडा) यांच्या गोठ्यातील म्हैस चोरट्यांनी १३ मार्चच्या रात्री पळविली होती. दुसऱ्या दिवशी ही घटना समोर आल्यावर वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश राऊत, कर्मचारी वसंत लटपटे, विक्रम देशमुख, वाल्मिक निकम, संजय भोसले, ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर धापसे, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांनी तपास सुरू केला. तेव्हा ही चोरी आरोपी निसार शेख याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्याच्या मागावर असताना २३ मार्च रोजी रात्री संशयित बोलेरो पिकअप जीप पोलिसांनी करंजखेड येथील काकासाहेब देशमुख चौकात अडविली. यावेळी वाहनात असलेल्या आरोपी निसार आणि वसीम यांच्याकडे गाडीतील बैल कोणाचे याविषयी चौकशी केली. बैलांचे दाखले त्यांच्याजवळ नव्हते तसेच ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी खाक्या दाखविताच गावातील सोहेल कुरेशीच्या मदतीने पशुधन चोरी करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलीस तपासात त्यांनी दीपक वाघ, शेख सलमान आणि सूर्यभान वळवळे यांच्या म्हशी चोरी केल्या आणि मालेगाव येथील व्यापाऱ्याला विक्री केल्याचे सांगितले. म्हशीची वाहतूक करण्यासाठी बोलेरो जीपचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले.
=====
चौकट
पैसे घेतले आपसांत वाटून
आरोपींनी म्हैशी विक्री करून आलेली रक्कम आपसांत वाटून घेतली. या पैशांतून आरोपी वसीम याने मोबाईल खरेदी केल्याचे तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल जप्त केला.