छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गांवर लवकरच इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) असलेले विशेष असे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. स्पीडगन ज्याप्रमाणे अतिवेगाने जाणारे वाहन टिपते, त्याचप्रमाणे हे कॅमेरे अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांसह ट्रिपल सीट, हेल्मेट नसणारे दुचाकीचालक, लेन कटिंग करणारे वाहन, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांना टिपतील. अशांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल.
राज्य रस्ता सुरक्षा कक्षाचे उपायुक्त भरत कळसकर यांनी नुकताच यासंदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी डेटा गोळा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग, जालना रोड, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर- अहमदनगर रोड, जळगाव रोड या मार्गांवर हे कॅमेरे आगामी काही दिवसांत बसविण्यात येतील. रस्त्यावर आरटीओ अधिकारी-कर्मचारी नसले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, धाेकादायकपणे वाहन चालविणाऱ्यांना हे कॅमेरे टिपतील. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
वाहतूक नियमांचे पालन करावेजिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांची माहिती मागविण्यात आली आहे. या रस्त्यांवर आयटीएमएस विशेष असे कॅमेरे बसविण्यात येतील. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अतिवेगाने जाणारे, हेल्मेट नसलेले, लेन कटिंग करणारे, मोबाईलवर बोलणारे, ट्रीपल सीट जाणारे वाहनचालक टिपले जातील. अशांवर कारवाई केली. त्यातून वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिस्त वाढण्यास मदत होईल. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)