हिंगोली : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यात टंचाईच्या प्रस्तावांची निव्वळ टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप आता ग्रामीण भागातून होत आहे. जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालयातील या खेळात टंचाईची दाहकता मात्र ग्रामस्थांना सोसावी लागत आहे.सध्या जिल्ह्यात विहिरी व बोअरच्या अधिग्रहणाचे ७५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. याशिवाय १0 गावांत आठ टँकर सुरू आहेत. यापैकी एक खाजगी टँकर आहे. नळयोजना विशेष दुरुस्तीचे जठारवाडी व हत्ता देववाडी यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाणीटंचाईत दुरुस्तीचे आठ प्रस्ताव पाठविले होते. त्यात त्रुटी निघाल्याने त्यांनी ते परत पाठविले. मात्र यात महिना निघून गेला आहे. याशिवाय यांत्रिकी विभागाने २८ गावांत ३१ बोअर घेण्याचे प्रस्ताव पाठविले होते. तेही अद्याप तसेच पडून आहेत. या दोन्ही विभागांत कधी ताळमेळ साधला जात नसल्याचे गतवर्षीही अनुभवायला मिळाले होते. मात्र जानेवारीनंतर गेल्यावर्षी पाणीटंचाईत निदान प्रस्ताव मंजूर झाले होते. ही मंजूर झालेली कामे पावसाळ्यातही पूर्ण करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले. त्यामुळे टंचाईत मंजूर होणाऱ्या कामांना काही महत्त्वच उरत नाही. ग्रामस्थही या झंझटी नको म्हणून थेट टँकरचीच मागणी करतात. या सर्व प्रकारात टंचाईच्या झळा मात्र सोसणे क्रमप्राप्त ठरते. प्रस्तावांची चौकशी, त्रुटी असणे याचा ससेमिराही आड येतो. (जिल्हा प्रतिनिधी)
टंचाईचे उपाय टोलवाटोलवीतच
By admin | Published: February 17, 2016 10:54 PM