सिल्लोड / वडोदबाजार : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून ते चुकविताना वाहनधारकाला तारेवरची कसरत करावी लागते. असाच एक खड्डा चुकविताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास चिंचखेडा गावाजवळ घडली. सुनील प्रभाकर ताठे (२२, रा. गेवराई सेमी, ता. सिल्लोड) असे मयताचे नाव आहे.
सुनील ताठे हा माणिकनगर (भवन) येथे गॅरेजमध्ये कामाला होता. काम संपवून तो नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी औरंगाबाद-जळगाव महामार्गावरून दुचाकीवरून (एमएच २० एफ २६५२) गेवराई सेमीकडे निघाला. दरम्यान गेवराई गावाजवळील खड्डा चुकविण्याच्या नादात पाठीमागून येणाऱ्या ट्रक (एमएच.२० ए. ए. ७८६०) ने त्याच्या दुचाकीस जोराची ध़डक दिली. यात दुचाकीस्वार सुनील जागीच ठार झाला. सुमारे वीस मिनिटे मृतदेह रस्त्यावरच पडून होता. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी खासगी वाहनातून त्यास सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
----
कर्ता मुलगा गेला, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मृत सुनील ताठे हा मेहनती होता. गॅरेजवर काम करून तो कुटुंबीयांना आर्थिक मदत करीत. घरातील सर्व जबाबदारी त्याच्यावर होती; पण नियतीने या कर्त्या पुरुषावर घाला घातल्याने ताठे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुनील ताठे याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
-----
सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम करणारे ठेकेदार या अपघाताला जबाबदार आहेत. जागोजागी खड्डे पडले असून वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुनील ताठे या युवकाचादेखील त्यामुळेच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
120921\img-20210912-wa0400.jpg
क्याप्शन
अपघातग्रस्त ट्रक व मोटार सायकल
2) सुनील प्रभाकर ताठे यांचा पासपोर्ट फोटो