कसाबखेडा : समृद्धी महामार्गाच्या कामावरील हायवा चालकाला विद्युत तारांचा अंदाज न आल्याने तारांचा स्पर्श हायवाला झाला आणि हायवाने क्षणार्धात पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, हायवाचे मोठे नुकसान झाले.
कसाबखेडापासून काही अंतरावर असलेल्या पोटूळ फाट्यालगत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या कामात भराव टाकण्यासाठी हायवाद्वारे आजूूबाजूच्या परिसरातून माती, मुरूम आणला जातो. मंगळवारी महामार्गाच्या कामावरील हायवा चालक पोटूळ फाट्यावरील मधुकर इंगळे यांच्या शेतातील माती घेण्यासाठी गेला. या ठिकाणी शेतातून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीचा अंदाज न आल्याने हायवाचा स्पर्श तारांना होताच हायवाच्या पाठीमागील भागाला आग लागली. तेव्हा पोटूळ फाट्याजवळील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी चालकाला ओरडून सांगितले. तेव्हा चालकाने जिवाच्या आकांताने हायवामधून उडी घेतली. तेव्हा काही नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्याचबरोबर गंगापूर पोलीस ठाण्यात ही माहिती दिली गेली. काही वेळाने अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आग विझविली. मात्र तोपर्यंत हायवाचे मोठे नुकसान झाले होते.