सिल्लोड : सिल्लोड शहरात ट्रकने दुचाकीला चिरडल्याने दुचाकीवरुन जाणा-या सख्ख्या चुलत भावापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी ६ वाजता बिलालनगर परिसरात घडला. विशेष म्हणजे चुलत भावाच्या वाढदिवशीच दुसºया भावाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मयत झालेल्या तरुणाचे नाव रोहित अशोक बचाटे (२३, रा. जयभवानीनगर सिल्लोड) असे आहे. तर शुभम् माणिकचंद बचाटे (२५, रा. जयभवानीनगर सिल्लोड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित व शुभम् हे दोघे सख्खे चुलतभाऊ आहेत.शुभम्चा शनिवारी वाढदिवस असल्याने हे दोघे वाढदिवस साजरा करण्यासाठी जातो म्हणून घरुन दुचाकीवर निघाले. जळगावहून औरंगाबादकडे जाणाºया ट्रकने या दुचाकीला (एमएच २०-ईएच-६३६६) जोराची धडक दिली. यात रोहित जागीच ठार झाला. गंभीर जखमी झालेल्या शुभम्ला नागरिकांनी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.मयत रोहित हा अंबादास बचाटे यांचा पुतण्या असून, ७ महिन्यांपूर्वीच अंबादास बचाटे यांच्या मुलाचाही अपघाती मृत्यू झाला होता. आता पुतण्याही अपघातातच गेल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोहितवर रविवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
ट्रकने दुचाकीला चिरडले; १ जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:46 AM