औरंगाबाद: ओव्हरटेक करीत पुढे निघालेल्या रेशनच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची भीषण घटना बुधवारी दुपारी ३.१० वाजेच्या सुमारास क्रांतीचौक उड्डाणपुलावर घडली. या अपघातानंतर पोलिसांनी चालकासह ट्रक ताब्यात घेतला.
सखाराम महादू गायकवाड ( ७१,रा. हर्षनगर, लेबर कॉलनी ) असे मृताचे नाव आहे. सखाराम गायकवाड हे सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी दुपारी त्याच्या एका ग्राहकाच्या मागणीनुसार देवघर तयार करून दुचाकीच्या मागील सीटवर बांधून घेऊन जात होते. दूध डेअरी चौकातून ते महावीर चौकाकडे निघाले. क्रांतीचौक उड्डाणपुलावर ते चढत असताना त्यांच्या मागून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने डाव्या बाजूला असलेल्या गायकवाड यांना उडवले. यात गायकवाड हे दुचाकीसह ट्रकच्या मागील चाकाखाली आले व अर्ध्या डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. या अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टू मोबाईल व्हॅनमधून मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला.
उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृताची दुचाकी, अपघातग्रस्त ट्रकमध्ये टाकून ही दोन्ही वाहने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली. या अपघाताची नोंद उस्मानपुरा ठाण्यात करण्यात आली. अपघातानंतर पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, हवालदार भगवान माहोरे, चव्हाण यांनी वाहतूक सुरळीत केली.