औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कोल्हापूरला नेण्यासाठी ताब्यात दिलेला तब्बल ३२ लाख १६ हजार ३५७ रुपयांचा दारूसाठा दोन ट्रकचालक आणि ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकांनी पळविल्याचे समोर आले. हा प्रकार १८ ते १९ जानेवारीदरम्यान घडला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.ट्रकचालक बाळकृष्ण शंकर इंगळे, प्रमोद यादव चोरमारे आणि बजाजनगर येथील शिवनेरी ट्रान्सपोर्टचे मालक जगन्नाथ पाटील, अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा एमआयडीसीतील युनायटेड स्पिरिट लिमिटेड या कंपनीकडे कोल्हापूर येथील रॉयल ट्रेडर्स या शासकीय परवानाधारक दारू विक्रेत्याने दारूची मागणी नोंदविली होती. मागणीनुसार कंपनीने बजाजनगर येथील शिवनेरी ट्रान्सपोर्टचे मालक जगन्नाथ पाटील यांना दारू वाहतूक करण्याचे काम सोपविले. पाटील यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीने बाळकृष्ण इंगळे आणि प्रमोद चोरमारे या चालकांना (ट्रक क्रमांक एमएच-१९ झेड २५५६) कंपनीत पाठविले. १८ जानेवारी रोजी त्यांनी ट्रकमध्ये ३२ लाख १६ हजार ३५७ रुपये किमतीची दारू विश्वासाने दिली. हा दारूसाठा कोल्हापूरला १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पोहोचविण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून हा दारूसाठा कोल्हापूरमधील रॉयल ट्रेडर्सला न पोहोचविता त्यांनी परस्पर दुसºयाच ठिकाणी नेऊन गायब केल्याचे समोर आले. वेळेत दारूसाठा प्राप्त न झाल्याचे रॉयल ट्रेडर्सकडून कळताच कंपनीचे अधिकारी नंदकिशोर कैलास सिन्हा यांनी याविषयी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांचे मोबाईल बंद असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी लगेच या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविली. त्यानंतर सिन्हा यांनी आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात फिर्याद नोंदविली. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण तपास करीत आहेत.कोटआरोपींचा शोध सुरू३२ लाखांचा दारूसाठा पळविण्यात आल्याची तक्रार प्राप्त होताच आम्ही गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींनी हा माल कोठे लपविला अथवा कोणाला विक्री केला का, याबाबतचा तपास सुरू आहे.- सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक़
ट्रकचालकाने पळविला ३२ लाखांचा दारूसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:15 PM