वाळूज महानगर :साऊथ सिटी जवळील घटना
वाळूज महानगर : ट्रक चालकास दुचाकीवरुन आलेल्या तिघा भामट्यांनी मारहाण करुन २७ हजार ६०० रुपये लुटल्याची घटना गुरुवार (दि.१०) सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास साऊथ सिटी जवळील एका पेट्रोलपंपासमोर घडली.
पल्लविंदर चरणसिंग तत्तले (४६ रा. श्रीरामपूर) हा ट्रक चालक-मालक आहेत. ८ डिसेंबरला पल्लविंदर हा ट्रक (क्रमांक एम.एच.१७, बी.वाय.१३१३) घेऊन छत्तीसगड येथून श्रीरामपुरला घरी जाण्यासाठी निघाला होता. बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील साऊथ सिटी समोर असलेल्या पेट्रोल पंपासमोर पल्लविंदर याने ट्रक उभी करुन झोपी गेला होता. गुरुवारी सकाळी ५.२० वाजेच्या सुमारास पल्लविंद याच्या ट्रकजवळ आणखी दोन ट्रक या पेट्रोलपंपाजवळ आले. यानंतर काही वेळातच दोन पल्सर तसेच दोन मोपेडवरुन तिघेजण या पेट्रोलपंपावर आल्यानंतर त्यांनी पल्लविंदरच्या ट्रकमध्ये प्रवेश केला. ट्रकचालक पल्लविंदर यास या तिघा भामट्यांनी मारहाण करुन त्याच्या खिशातील रोख २७ हजार ६०० रुपये बळजबरीने हिस्कावून घेतले. या लुटमारीच्या घटनेनंतर चालक पल्लविंदर याने एका मोपेडचा (क्रमांक एम.एच.२०, ए.एक्स७७७१) चा नंबर टिपून ठेवत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून भामट्यांचा शोध घेतला. मात्र ते पसार झाल्याने पोलिसांनी पेट्रोलपंपावर थांबलेल्या इतर ट्रक चालकाकडे चौकशी करुन पल्लविंदर यास तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
भामट्यांनी चालकास आडवून पुन्हा मारहाण
या लुटमारीच्या घटनेनंतर ट्रक चालक पल्लविंदर हा सकाळी ७ वाजेच्या सुमारास अॅपेरिक्षा (क्रमांक एम.एच.२०, ई.एफ.४३१८) मध्ये बसून तक्रार देण्यासाठी एमआयडीसी वाळूज ठाण्याकडे येत असताना पंढरपूरच्या तिरंगा चौकात लुटमार करणाऱ्या भामट्यांनी रिक्षा अडवून पल्लविंदर यास रिक्षातून बाहेर उतरण्यास भाग पाडले. यानंतर चौघा भामट्यांनी पल्लविंदर यास पोलीस ठाण्यात तक्रार देऊ नकोस, आम्ही तुझे पैसे परत करतो असे म्हणून त्याला रोखून धरले. मात्र पल्लविंदर याने या भामट्यांना न जुमानता पोलीस ठाणे गाठून लुटमारीची तक्रार दिली आहे.