औरंगाबाद : रस्ता ओलांडून एका खाजगी कंपनीत ड्यूटीसाठी जात असताना आलेल्या भरधाव ट्रकने एकास उडविले. या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना भालगाव शिवारात रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भालगाव शिवारात एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षकाची नोकरी करीत असलेले धम्मदीप रामराव प्रधान (३७, रा. रेणुकामाता मंदिर, सातारा परिसर) हे रात्रपाळीसाठी जात होते. त्याचवेळी आलेल्या भरधाव ट्रकने (क्र. जी.ए.- १२, झेड.- ९५५३) धम्मदीप यांना मध्यरस्त्यात असताना उडविले. यात चाकाखाली आलेल्या धम्मदीप यांचा जागीच मृत्यू झाला. एका बाजूच्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दोन्हीकडील वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे. यात रस्ता ओलांडत असताना ट्रकने धम्मदीप यांना उडविले असल्याची माहिती चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण कटकोरी यांनी दिली. भरधाव ट्रकने चिरडल्यानंतर धम्मदीप यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन शनिवारी सकाळी करण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सोबत फोटो : धम्मदीप प्रधान
भरधाव ट्रकने सुरक्षारक्षकास उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:34 PM
औरंगाबाद : रस्ता ओलांडून एका खाजगी कंपनीत ड्यूटीसाठी जात असताना आलेल्या भरधाव ट्रकने एकास उडविले. या अपघातात एक जण ...
ठळक मुद्देऔरंगाबादजवळील भालगाव शिवारातील घटना