शिऊर (ता. वैजापूर) : वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या चित्रगुप्त मंदिरासमोर पिकअप व्हॅन व लाकडाने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन व्हॅनमधील तीन जण जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. अपघातात मरण पावलेले तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ते ३० ते ३५ वयोगटातील आहेत.बाळू पवार (रा. धनगरवाडी), गणेश वारे (रा. औराळी), लहानू वाघ (रा.औराळा) अशी मृतांची नावे आहेत. बद्रीनाथ निकम (रा. हिंगणा) हे जखमी आहेत.कन्नड तालुक्यातील औराळा व शेजारच्या गावातून चौघे जण पिकअप व्हॅन घेऊन राहाता येथे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी डिझेल मशीन खरेदी करण्यासाठी गेले होते. ते मशीन घेऊन आपल्या गावी परतत असताना सिल्लोडहून लाकडे भरून कोपरगावकडे जाणाºया ट्रकने (एमएच-१७-टी -९५१९) पिकअपला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रक पिकअपवर (एमएच-२०-ईजी-३८६१) पलटी झाल्याने ट्रकखाली पिकअप दबल्या गेला. यात किती माणसे दबले हे कोणासही कळत नव्हते. दरम्यान, रस्त्याच्या बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने ट्रक व पिकअप बाजूला करुन तब्बल तासभर झटून त्यातून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय जाधव, गणेश सोनवणे, टिल्लू सोनवणे, रामा जाधव, स.पो.नि. धनंजय फराटे, रोहिदास तांदळे व ग्रामस्थांनी मदतकार्य केले.
ट्रकची पिकअप व्हॅनला धडक; तीन जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:06 AM