औरंगाबाद : शहरात जड वाहनांची वाहतूक वाढत असल्यामुळे ट्रक टर्मिनल शहराबाहेर नेण्यासाठी गुरुवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. शरणापूर अथवा करोडी यापैकी एक जागा ट्रक टर्मिनलसाठी निश्चित करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत टर्मिनल उभारून घेण्याचा विचार बैठकीत झाला आहे. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ. पांडे, शहर अभियंता एस. डी. पानझडे, एमएसआरडीसीचे उपअभियंता उदय भरडे, मनपा अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ट्रक टर्मिनल असले पाहिजे. अशी गुरुवारच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे करोडी येथील परिसरात टर्मिनल होण्याची शक्यता आहे. दिवसाकाठी शहरात किती ट्रक येतात. त्या ट्रकमध्ये कोणत्या प्रकारचा माल असतो. याचा आकडा रस्ते विकास महामंडळाच्या एका पाहणीनुसार घेतला जाणार आहे. तसेच मनपाच्या एलबीटी कक्षाकडे देखील येणाऱ्या वाहनांचा आकडा आहे. त्यानुसार टर्मिनलची जागा, वाहने, बीओटीवर करायचे की शासकीय संस्थाने याचा निर्णय होणार आहे.
ट्रक टर्मिनल शहराबाहेर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 12:02 AM