औरंगाबाद : अवैध वाळू वाहतूकप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या ट्रक वर महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. ही बाब खटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिक तपास केला असता एकाच क्रमांकाचे दोन ट्रक असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती सिल्लोडचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक यांना कळवून दुसऱ्या ट्रकवर सिल्लोड येथे कारवाई करून तो जप्त केला. पोलिसांनी मनावर घेतले की, कोणताही गुन्हा जास्त दिवस लपून राहत नाही. याचाच प्रत्यय पोलिसांच्या या कारवाईमुळे आला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंधरा दिवसांपूर्र्वी सिडको हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (क्रमांक एमएच-२० सीटी ४४३२) हा पकडला होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबतची माहिती दिली. त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित ट्रक नियमानुसार वाळू वाहतूक करीत असल्याचे त्यांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी या ट्रकचे वजन केले असता क्षमतेपेक्षा अधिक टन वाळू वाहतूक करीत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आरटीओला पत्र पाठवून याबाबत माहिती दिली. दरम्यान, आरटीओकडून त्या ट्रकवर कारवाई प्रस्तावित असताना पोलिसांनी पकडलेला नंबर आणि रंग सारखाच असलेला दुसरा ट्रक सिल्लोड येथे कार्यरत असल्याची माहिती खबऱ्याने सावंत यांना दिली. त्यानंतर सावंत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सिल्लोड येथे पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री केली असता पोलिसांनी पकडलेल्या क्रमांकाचा दुसरा ट्रक सिल्लोड येथे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सिल्लोड येथे कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक यांच्याशी संपर्क साधून एकाच क्रमांकाचा दुसरा ट्रक सिल्लोड येथे असल्याचे कळविले. येथे पकडण्यात आलेल्या ट्रकची कागदपत्रे आणि छायाचित्र व्हॉटस्अॅपमार्फत त्यांना पाठविली. त्यानंतर सिल्लोड पोलिसांनी एकाच क्रमांकाचा दुसरा ट्रक जप्त केला. सिल्लोड पोलिसांनीही या ट्रकची माहिती महसूल विभागाला कळविली. तसेच आरटीओ प्रशासनाला पत्र पाठवून खऱ्या क्रमांकाचा ट्रक कोणता आहे, याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. आरटीओकडून सविस्तर अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.
ट्रक दोन, दिसायला सारखेच; नंबर मात्र एकच
By admin | Published: October 09, 2016 12:51 AM