औरंगाबाद : आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणारी ट्रूजेटची औरंगाबाद-अहमदाबाद विमानसेवा प्रवाशांच्या प्रतिसादामुळे २७ आॅक्टोबरपासून दररोज उड्डाण घेणार आहे. याच दिवसापासून स्पाईस जेटची औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू होणार आहे, तर स्पाईस जेटकडून अहमदाबाद आणि मुंबईसाठीही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत.
औरंगाबाद- हैदराबाद विमानसेवा चालविणाऱ्या ट्रूजेट कंपनीने औरंगाबादकरांना सुखद धक्का देत १ सप्टेंबरपासून अहमदाबाद- औरंगाबाद-अहमदाबाद विमानसेवा सुरू केली. आठवड्यातून रविवार, सोमवार आणि शुक्रवार, अशी तीन दिवस ही सेवा दिली जात आहे. ७० आसनी विमानाद्वारे ५० ते ५५ प्रवासी अहमदाबादला जातात. वाढत्या प्रतिसादाने ही विमानसेवा दररोज चालविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २७ आॅक्टोबरपासून ही विमानसेवा दररोज सुरू होत असल्याचे ट्रूजेट अधिकाऱ्यांनी सांगितले.
हैदराबादचे ‘उड्डाण’स्पाईस जेटकडून ८ आॅक्टोबरपासून सकाळच्या वेळेत दररोज औरंगाबाद- दिल्ली विमानसेवा सुरू झाली. दिल्लीपाठोपाठ या कंपनीकडून आता २७ आॅक्टोबरपासून औरंगाबाद- हैदराबाद विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
स्लॉटला मंजुरी : स्पाईस जेटला अहमदाबाद- औरंगाबाद आणि मुंबई- औरंगाबाद विमानसेवेसाठी स्लॉटला मंजुरी मिळाली आहे. लवकरच वेळापत्रक जाहीर होईल, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत म्हणाले.
मुंबईची कनेटिव्हिटी वाढणारहैदराबाद विमानसेवेनंतर अहमदाबाद आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारीही स्पाईस जेट कंपनीने केली आहे. या दोन्हीसाठी स्लॉटला (उड्डाणाची वेळ) मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रस्तावित मुंबई विमानसेवेमुळे जेट एअरवेज बंद झाल्यापासून कमी झालेली मुंबईची कनेक्टिव्हिटी पुन्हा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.