औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत उभ्या राहणाऱ्या आॅरिक सिटीत पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी सुरू आहे. देशात ‘ट्रंक ’ ही भूमिगत पायाभूत सुविधा प्रणाली राबविणारे ‘आॅरिक ’ पहिलेच औद्योगिक क्षेत्र राहणार आहे.
‘डीएमआयसी’अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी आॅटोमोबाईल, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, अन्न व प्रक्रिया उद्योगांचे हब ठरणार आहे. यासाठी ‘एमआयडीसी’ने शेंद्रा, लाडगाव- करमाड, डीएमआयसी टप्पा-१ यासाठी ८४६ हेक्टर क्षेत्र संपादित केले. ही जमीन हस्तांतरित करून ७८६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे कंत्राट दिले. यात रस्ते, सांडपाणी निचरा, भूमिगत विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या, केबल नेटवर्क, पथदिवे, मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
आॅरिक सिटीची उभारणी गतीने सुरूआहे. यामध्ये वाणिज्यिक, औद्योगिक आणि निवासी गरजेनुसार सोयीसुविधा होत आहेत. आगामी किमान पाच दशकांचा विचार करून पायाभूत सुविधा उभारल्या जात आहे. आजघडीला उद्योग आणि निवासासाठी आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये उच्च दाबासह सर्व विद्युत वाहिन्यांचे जाळे, सांडपाणी, मुख्य जलवाहिनी, सांडपाणी प्रक्रिया केलेले पाणी, जलवाहिनींचे काम केले जात आहे. या सगळ्यांसाठी विशेषत: विद्युत वाहिन्यांसाठी, केबल नेटवर्कसाठी भूमिगत ट्रंक प्रणालीचा (ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर) वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे उच्च दाबाची असो किंवा अन्य कोणत्याही तारावरून जाणार नाही. यामध्ये नीटनेटकेपणा असावा, म्हणून सर्व वाहिन्या भूमिगत पद्धतीने नेण्यात येत आहे. शिवाय देखभाल-दुरुस्तीसाठी ही प्रणाली अधिक सोयीची ठरते. देशात प्रथमच अशा ट्रंक प्रणालीचा वापर आॅरिक सिटीत केला जात आहे.
७० टक्क्यांवर काम पूर्ण रस्ते, पदपथ, पथदिवे, जलनिस्सारण व्यवस्था आदी पायाभूत सुविधांचे ७० टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. ‘डीएमआयसी’साठी जायकवाडीतून पाणी आणणाऱ्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे आले. उड्डाणपुलांचीही उभारणी सुरू आहे. जलवाहिनीचे ५६ पैकी ५५ कि.मी. अंतराचे काम झाले आहे. डिसेंबरपासून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.