छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवून घेतली. या कालावधीत सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास आहे. पण, दगाफटका होऊ शकतो, हे गृहीत धरून आम्ही गाफील न राहता प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. जरांगे पाटील म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे, आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय हवा आहे, ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी आहे.
१ डिसेंबरपासून विदर्भ व कोकणात संवाद दौरा जरांगे पाटील यांच्या पहिल्या टप्प्यातील संवाद दौऱ्याला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी लाखोंच्या सभा झाल्या.जरांगे पाटील यांनी शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली असल्याने १ डिसेंबरपासून ते आता विदर्भ आणि कोकणात संवाद दौरा करणार आहेत.
मी जरांगेंना भेटणार नाही : भुजबळ मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी जाणार नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केले. जरांगे यांनी भुजबळ यांना टीकेचे लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे यांची भेट घेणार काय, या प्रश्नावर भुजबळ यांनी नकारार्थी उत्तर दिले.