- राम शिनगारे
औरंगाबाद : आठ वर्षांच्या थकीत वेतनाचे तीन शिक्षकांचे ४६ लाख ९४ हजार रुपये बँक खात्यात जमा न करता कोऱ्या धनादेशाआधारे संस्थाचालकाने काढून घेतल्याची तक्रार या शिक्षकांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांच्याकडे केली आहे.
डिसेंबर २००७ ते २०१५ पर्यंत विनावेतन काम केल्यानंतर शासनाने वेतनाला मंजुरी दिली. या थकीत वेतनापोटी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शाळेचा संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. यातील ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ता शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्यापूर्वीच संस्थाचालकाने तीन शिक्षकांकडून प्रत्येकी चार कोरे धनादेश घेतले होते. हे धनादेश परवानगीशिवाय कोठेही वापरणार नसल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात धनादेशाद्वारे रक्कम काढून घेतली.
सिल्लोड तालुक्यातील पानवडोद बु. येथे स्वा. सै. कै. गंगारामजी मानकर माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावीच्या वर्गाला २००७ साली ८० टक्के आणि २००८ मध्ये १०० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. मात्र, शिक्षकांना पगार द्यावा लागेल म्हणून संस्थाचालक शिक्षकांच्या नियुक्तीला शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता घेत नव्हता. मात्र, २०१५ साली शाळेतील एका शिक्षकाने पिळवणुकीला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाचा गाजावाजा होताच शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन तपासणी केली. तेव्हा ३१ मार्च २०१५ रोजी चार सहशिक्षक, एक मुख्याध्यापक, लिपिक आणि शिपाईपदाला मान्यता दिली. त्यानंतर मान्यता मिळालेल्या सर्वांचे थकीत वेतन २००७ पासून मिळणार होते. त्यामुळे शाळेचा संस्थाचालक सुभाष मानकर यांनी मुख्याध्यापकसुनील लोखंडे यांच्या मार्फत नातेवाईक नसलेल्या तीन शिक्षकांकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पानवडोद बु. या शाखेतील खात्याचे प्रत्येकी चार कोरे धनादेश घेतले. शासनाने थकीत वेतनाचे १ कोटी ४८ लाख रुपये मंजूर केले आहेत. हा निधी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांच्या संयुक्त बँक खात्यात जमा झाला आहे. मुख्याध्यापकाने २४ जुलै २०१९ रोजी थकीत वेतनाचा पहिला ९१ लाख रुपयांचा हप्ता शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केला.
यातील मुख्याध्यापक, एक शिक्षक, लिपिक आणि शिपाई हे संस्थाचालकांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्याकडून कोरे चेक घेण्यात आलेले नव्हते. मात्र, तीन शिक्षकांचे घेतलेले कोरे चेक बँकेच्या व्यवस्थापकाशी संगनमत करून तात्काळ वटवले. यानंतर दुसरा हप्ता अद्यापही शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. तो जमा करण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली तरीही त्यास दाद दिली नाही. उलट जिवे मारण्याच्या धमक्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापक देत असल्याची तक्रार माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. याविषयी शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
एका मिनिटात गायब झाले ४७ लाख रुपयेदहा वर्षांपासून विनावेतन काम केल्याचा मोबदला शासनाने मंजूर केला. मात्र, संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी बँक व्यवस्थापकाशी संगनमत करून जमा केलेली रक्कम अवघ्या एका मिनिटात शिक्षकांच्या बँक खात्यातून काढून घेतली. २४ जुलै रोजी सकाळी ११.४७ मिनिटांनी ९१ लाख रुपये जमा करण्यात आले. यातील तीन शिक्षकांच्या बँक खात्यातून ४६ लाख ९४ हजार रुपये ११.४८ मिनिटांनी काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यात तीन शिक्षकांची प्रत्येकी १६ लाख ६० हजार, १५ लाख ६७ हजार आणि १४ लाख ६७ हजार एवढी रक्कम काढून घेण्यात आली. यातील एका शिक्षकाने संस्थाचालक अधिक त्रास देईल यामुळे माघार घेतली आहे.
मुख्याध्यापकाचा प्रतिसाद नाहीया प्रकरणात संस्था आणि मुख्याध्यापकांची बाजू समजून घेण्यासाठी मुख्याध्यापक सुनील लोखंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा दोन वेळा भ्रमणध्वनी व्यस्त होता. त्यानंतर त्यांना एसएमएस पाठविण्यात आला. त्यालाही उत्तर दिले नाही. पुन्हा भ्रमणध्वनी लागला असता, प्रतिसाद दिला नाही.