छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या विद्यमान विश्वस्त मंडळाला धर्मादाय उपआयुक्तांनी फेरफार अहवाल (चेंज रिपोर्ट) अमान्य करीत नियमबाह्य ठरविले आहे. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना संस्थेतील धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी करणारी निवेदने शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, उच्चशिक्षण सहसंचालकांसह विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आली आहेत.
स.भु. शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी निवडणूक घेतली. ही निवड २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी होती. मात्र, २०१३-१८ या कालावधीसाठीची निवडणूक दि. १५ डिसेंबर २०१३ रोजी झाली होती. त्यामुळे पूर्वीच्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ दि.१५ डिसेंबर २०१३ रोजी संपुष्टात आला होता. हा कार्यकाळ संपल्यानंतर दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी घेतली. त्यास दि.२९ जून २०१९ रोजी नियामक मंडळाची अंतिम मंजुरी घेण्यात आली. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजीवाहू कार्यकारी मंडळास निवडणुकीसारखे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. त्यासाठी धर्मादाय कार्यालयाची मान्यता घ्यावी लागते.
या कारणामुळे दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी घेतलेली निवडणूक वैध ठरत नाही, असे धर्मादाय उपआयुक्तांनी स्पष्ट करीत विद्यमान कार्यकारिणीने पाठविलेला चेंज रिपोर्ट १२ ऑगस्ट २०२२ रोजी फेटाळला. याविषयी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी विलास पाटील यांनी स.भु. संस्थेत वैध पदाधिकारी नसताना संस्थेतील शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नतीसारखे धोरणात्मक निर्णय घेतल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक, धर्मादाय आयुक्तांकडे नुकतीच केली. त्यावर शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशीचा आदेश दिला. शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेला पत्र पाठवून यावर खुलासाही मागविला आहे.
प्राध्यापकांच्या भरतीवर आक्षेपनियमित विश्वस्त मंडळ नसतानाच संस्थेच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती करण्यात येत आहे. नियमबाह्य पद्धतीने होणारी ही भरती थांबविण्याच्या मागणीचे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू, उच्चशिक्षण सहसंचालकांना डॉ. जितेंद्र मगर यांच्यासह विविध प्राध्यापक संघटनांनी दिले आहे.
सहआयुक्तांकडे अपील दाखलसंस्थेचे विद्ममान सरचिटणीस डॉ. नंदकुमार उकडगावकर यांनी जि.प.च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार संस्थेचा चेंज रिपोर्ट धर्मादाय उपआयुक्तांनी फेटाळल्यानंतर संस्थेने धर्मादाय सहआयुक्तांकडे अपील दाखल केले आहे, तसेच संस्थेतील शिक्षकांच्या केलेल्या बदल्या संस्थेच्या शेड्यूल १ मध्ये येत नाहीत. त्यामुळे या बदल्या बाधित होत नसल्याचा खुलासाही पत्राद्वारे केला आहे.