औरंगाबाद : आपले जीवन सार्थक करायचे असेल, तर तुमच्यात ऊर्जा, ताजेपणा यासोबतच सदसद्विवेकबुद्धी अर्थात ‘होश’ असला पाहिजे. मी काय मिळविले, यापेक्षा आणखी मोठे यश प्राप्त करणार, या जिद्दीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘ऑनलाइन संवाद’ उपक्रमात अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शुक्रवारी संवाद साधला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख, डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारत गणेशपुरे यावेळी म्हणाले, मागील दीड वर्षाने आपल्याला खूप काही शिकविले. निसर्ग हा माणसापेक्षा बलशाली असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. माणूस समाजशील प्राणी आहे. मात्र, त्याच्यावर ‘आयसोलेटेड’ राहण्याची वेळ आली. या लाटेत जे स्वत:मध्ये बदल करून घेतील तेच टिकाव धरू शकणार आहेत. कला, संस्कृती व मनोरंजनाचे क्षेत्रही बदलत आहे. ग्रामीण भागात वाडी, तांड्यांवरील मुले आपल्या अभिनयाने नावलौकिक मिळवीत आहेत. जगात अशक्य असे काहीच नसते, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे.
डॉ. जयंत शेवतेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले.
नाट्यशास्त्र विभागाला गतवैभव मिळवून देऊ
विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाने नाट्य, कला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राला देदीप्यमान यश मिळवून दिले आहे. या विभागाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले.
कलावंतांनाही खासगी जीवन असते
कोणत्याही क्षेत्रात सेलेब्रिटी झालेल्याच्या घरात नको तेवढे डोकावण्याची वृत्ती वाढली आहे. कलावंताच्या पाठीमागेदेखील चुकीच्या पद्धतीने चर्चा होतात. कलावंतालादेखील खासगी जीवन असते, ते त्याला जगू दिले पाहिजे, असेही भारत गणेशपुरे म्हणाले.