औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणा-या देशी, विदेशी पर्यटकांना हर्सूल गावात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून या भागातील मालमत्तांचे भूसंपादन रखडले आहे. मनपाने यापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाची योग्य साथ न मिळाल्याने रुंदीकरण रखडले. आता मालमत्ताधारकांना योग्य मोबदला देऊन रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर विजय औताडे यांनी दिली.हर्सूल गावातील रस्ता सध्या ३० फुटांचा आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी पर्यटकांना किमान दहा ते पंधरा मिनिटे लागतात. वाहतूक कोंडी झाल्यास किमान अर्धा ते एक तास वाहनधारक अडकून पडतात. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी पुढाकार घेतला होता. मालमत्ताधारकांनीही आपली जागा देण्याची तयारी दर्शविली होती. महापालिका सर्व मालमत्ताधारकांना एफएसआय किंवा टीडीआर देणार होती. रस्त्याचा काही भाग मनपात येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी मालमत्ताधारकांना मोबदला देण्यासाठी आमच्याकडे निधी नाही, असे सांगितले. त्यामुळे गावकºयांनी अतिक्रमण हटाव पथकाला परत पाठवले. त्यानंतर या वाहतूक कोंडीकडे कोणीच लक्ष दिले नाही.तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी चिकलठाणा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न अवघ्या आठ दिवसांमध्ये निकाली काढला होता. आज चिकलठाणा गावातून वाहनधारकांना ये-जा करताना अजिबात त्रास होत नाही. चिकलठाण्याच्या धर्तीवर हर्सूलचा प्रश्नही सोडविण्यात यावा, अशी मागणी अनेकदा झाली. मात्र, त्यासाठी पुढाकार कोणीच घेतला नाही.उपमहापौर विजय औताडे हे स्वत: हर्सूलचे सुपुत्र असल्याने त्यांनी वाहतूक कोंडीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांची भेट घेतली. त्यांनी मालमत्ताधारकांना मोबदला देण्यासाठी निधीची तरतूद असल्याचे सांगितले. त्यामुळे गावातील वाहतूक कोंडी लवकरच सुटेल, अशी अपेक्षा आहे. रुंदीकरणात १५० च्या आसपास मालमत्ताधारक आहेत. सर्व मालमत्ताधारक जागा देण्यासही तयार आहेत.
हर्सूलची कोंडी पुन्हा फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:11 AM