औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने किसान रेल्वे सुरु केली असून, राज्यातील पहिली किसान रेल्वे ५२२ टन कांद्ये घेऊन मंगळवारी नगरसोलहून गुवाहाटीला रवाना झाली.
नगरसोल स्थानकहून फलाट क्रमांक एकवरून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पहिली किसान रेल्वे रवाना झाली. या किसान रेल्वेमध्ये प्रत्येकी २३ टन क्षमतेच्या २२ पार्सल व्हॅन आहेत. ही गाडी ५० तासांच्या कालावधीत २ हजार ५०० कि.मी. अंतर पार करून सुमारे ५२२ टन कांदे घेऊन ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता गुवाहाटी- आसाम येथे पोहोचेल.
दक्षिण मध्य रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी , यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली. नगरसोल स्थानकातून माल गाड्यांमधून कांद्याची लोडिंग अधूनमधून होत असे. या कांद्यांची मालगाड्यांमधून वाहतूक करण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल खरेदी करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी नांदेड विभागाच्या मालवाहतूक विभागाने शेतकरी, व्यापारी समुदायाशी नियमित बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या मालाची वाहतूक किसान रेल्वेने मालगाडीच्या तुलनेत अधिक सुलभतेने, कमी खर्चात, त्रास-मुक्त आणि जलद कशी करता येईल, या विषयी माहिती देण्यात आली. तसेच किसान रेल्वेच्या इतर सुलभ फायद्यांविषयी जागरूक केले. त्यातून अखेर ही रेल्वे सुरु झाली.
‘ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल’शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल’ च्या अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलादेखील कांद्याच्या वाहतुकीसाठी ५० टक्के दर सवलत देण्यात आली आहे.